मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आज ही बैठक होणार आहे.


शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीला खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर इत्यादी वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणालाही संधी न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबतची नाराजी जाहीर व्यक्तही केली आहे. शिवाय आज ‘सामना’तूनही शिवेसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्वत: उद्धव ठाकरेंनी बोलावलेली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.