मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटी निवडणुकीत पराभवानंतर आज शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं.या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही. पराभव हा कायमस्वरूपी नसतो. पुढच्या वेळेस आपण अधिक जोमाने, ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू."
ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बेस्टशी संबंधित प्रश्न, कर्मचारी आणि प्रवाशांच्या अडचणी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन केलं. समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहाणं आणि नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवत रहाणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत बेस्टच्या कामकाजात सुधारणा, सेवा गुणवत्ता आणि कर्मचारी वर्गाच्या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली.
एका पराभवातून खचणारा नाही : उद्धव ठाकरे
तुमची काम करण्याची जिद्द आणि निष्ठा महत्वाची फार महत्त्वाचं असतं. शिवसेनेनं यापूर्वी कमी वादळं आणि कमी संकटं पाहिली नाहीत असं नाही. शिवसेनेनं पाहिलेल्या वादळांना आणि संकटांना शिवसैनिक म्हणून तुम्ही उतर दिल आहे. बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही पण बेस्टच काय होईल याची काळजी आहे. आपलं सरकार असतं बेस्टला वैभवापर्यंत नेलं असतं. गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे सर्वाना कळलं आहे. कागदावर सत्ता कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते हे तुम्ही दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बेस्टची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. महापालिका, बेस्ट, एसटी यातील कर्मचारी निवृत्ती होतील, तशा जागा कंत्राटी तत्वावर भरल्या जात आहे. कामगार अस्थिर राहिले तर ते स्थिर राहतात. नेहमी तुम्हाला चिंताग्रस्त ठेवतायत उद्या काय यावर ठेवतायत, लटकती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवतायत. त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम बेस्ट कामगार सेना करते, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले, काल परवा झालेला पराभव याची कारण काहीही असतील,एका पराभवातून खचणारा मी नाहीये, पराभवाचं पुन्हा विजयात रुपांतर करण्याची जिद्द तुमच्यामुळं माझ्यात आहे. निष्ठूरपणानं बळकावण्याचं काम सुरु झालं आहे. पंतप्रधान आपला, मुख्यमंत्री आपला पाहिजे, महापौर आपला पाहिजे, बेस्टमध्ये ड्रायव्हर आपला पाहिजे. घ्यायचं असेल तर न्यायपद्धतीनं घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मत चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे,बोगस मतदान करायचं आणि आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे, असं मिरवायचं. याला लोकशाही म्हणत नाहीत, त्याला चोरशाही म्हणतात. मला चिंता आहे मुंबईवरचा मराठी ठसा याची, असंही ठाकरेंनी म्हटलं. कदाचित बेस्ट अदानीच्या हातात देतील, एअरपोर्ट दिलं, मोनो अनिल अंबानीकडे दिलंय. बेस्ट ही माझ्या शहराची रक्त वाहिनी आहे. एसटी राज्याची रक्तवाहिनी आहे.प्रत्येकाच्या घराजवळ जाणारी बेस्ट आहे. मी स्वत: बेस्टनं प्रवास केलेला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मी स्वतः बेस्टने प्रवास करणारा आहे शाळेत असताना कॉलेजला जाताना प्रवास केला आहे, तुंबलेल्या पाण्यातून बेस्ट कशी काढली हे मी पाहिली आहे.मी मुख्यमंत्री असताना दोन तीन डेपोच नुतनीकरण केलं होतं. कर्मचारी माणसं आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आपली बेस्ट कामगार सेना आहे.आता चांगलं काम केलंत, पगार दिला बोनस देण्याची परिस्थिती आहे की नाही माहिती नाही, सरकार यांचं आहे पण लोकांना द्यायला पैसा नाही,न्याय हक्काची लढाई करणारा माणूस हा बेस्ट कामगार सेनेचा आहे म्हणून मला बेस्ट कामगार सेना महत्वाची वाटते.तीन नवे दिलेत म्हणजे जुने काढले नाहीत. काही ठिकाणी बदल करावे लागतात. बदल केले म्हणजे संघटना वाढणारच आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मुंबई महाराष्ट्राने मिळवली पण त्या मुंबईत मराठी माणसाला स्थान नव्हतं. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली.मुंबईत मराठी माणसांनी हिंदूंना वाचवलं. आम्ही अस्सल मराठी बोलणारे, कट्टर कडवट राष्ट्राभिमानी हिंदू आहोत. कालच्या निवडणुकीत बेस्टच्या कामगारांनी शिवसेनेच्या पॅनेलला मतदान का केलं नाही हे एकमेकांमध्ये बोला. दाखवलं काय गेलं ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड अजून सुरुवात नाही झाली, सुरुवात झाल्यावर बघा तुमचा कसा बँड वाजतो. ठाकरे ब्रँड म्हणजे काय आपल्या राज्यातील मराठी हिंदूंसाठी आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला लढायची काय खाज आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.