Continues below advertisement


मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC) वाद टोकाला पोहोचला असून मराठा मोर्चानंतर आता ओबीसी समाजाचे मोर्चे आणि आंदोलन होत आहेत. महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी करत आज नागपूरमध्ये ओबीसींचा मोठा मोर्चा निघाला होता. त्याच, अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. नथुरम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी (Devendra Fadnavis) ही भांडणं लावत आहेत, अशी प्रखर शब्दात सपकाळ यांनी आरक्षणाच्या वादावरुन मुख्यमंत्र्‍यांवर टीका केली.


राज्यात ओबीसींना असलेल्या 17 टक्के आरक्षणात अन्य समाज आल्याने दोन्ही समाजाला न्याय देणं कठीण आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मुख्यमं६ी देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक जाती जातीत भांडणं लावत आहेत. मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर लागू करुन गुलाल उधळून देवेंद्रजीनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काम केलं आहे. मात्र, राहुल गांधींचा उपाय रामबाण आहे, तो म्हणजे जातीनिहाय जनगणना. तेलंगणा येथे काँग्रेस राजवटीत जातीय जनगणना झाली. त्यामुळे, 42 टक्के ओबीसींना आरक्षण मिळालं, मग देवेंद्रजी ते का करत नाहीत, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. तसेच, नथुराम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी ही भांडणं लावत आहेत, अशी प्रखर शब्दात सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तर, राधाकृष्ण़ विखे पाटलांनी वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम केलंय, असेही त्यांनी म्हटलं.



शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम


सहकारी मंत्री बाबासाहेब देसाई यांनी शेतकरी कर्ममाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी संताप व्यक्त केला. गाण्याचा नाद लागतो, रम्मीचा नाद लागतो इतकं बेशरम पद्धतीचं वक्तव्य मंत्री करतोच कसा. खोटं बोलून आम्ही सत्ता मिळवतो याची कबुली त्यांनी दिली आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे, उपरोक्त अनुदान दिलं नाही. खोटं पॅकेज जाहीर करता, त्या पॅकेजमध्येही काही नाही. याशिवाय अशी वक्तव्य करुन ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.


सत्ताधाऱ्यांनी मुंबई विक्रिला काढलीय - सपकाळ


काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर सर्व सामान्यांसाठी हौसिंग बोर्ड स्थापन केले, त्या काळास सर्व जमीन सरकारची ही भूमिका घेतली. विनोबा भावेंनी भूदान आणलं, त्यानुसार कसेल त्याची जमीन कूळ कायदयांतर्गत नेहरूनी कायदा आणून जमीन कसणाऱ्यांना जमिनींचं मालक केलं. तर, इंदिरा गांधींनी गायरान जमिनीचा निर्णय घेतला, भाडेकरुंनाही अधिकार दिले. गिरणींच्या जमिनींमध्येही 33 टक्के निर्णय घेतला, या शिवाय उपलब्ध जमिनीवर वसाहती उभे करणे हा निर्णय झाला. मात्र, आता मुंबईही विक्रीला काढली आहे. ज्यांना घरं बांधून दिली ती 12 हजार आहेत पण घर न मिळालेले 1 लाखांहून अधिक आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.


चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार (Chandrashekhar bawankule)


दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी मु्ख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांवर बोलले तरच मिडिया त्यांची दखल घेईल, असं त्यांचं असतं. कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहे का? काय बोलतात, असे बावनकुळे यांनी म्हटले. काँग्रेस पूर्णच साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा दवडत्यात, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटलं.


हेही वाचा


दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा; अहिल्यानगरमधील सभेनंतर अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य