बाळासाहेबांना अटक करताना 'आपुलकी' कुठे गेली होती : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2018 02:23 PM (IST)
मुलाखतीत शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. मात्र हा सर्व राजकारणाचा भाग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना, 2000 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षी अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती? असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला. शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषद प्रतोद आमदार निलम गोऱ्हे यांच्या 'शिवसेनेतील माझी 20 वर्षे' या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आर्थिक निकषानुसार आरक्षण ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली असती, तर जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या, असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. मात्र बाळासाहेबांची भूमिका न स्वीकारता जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्यात आलं, शिवसेना फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 1992-93 साली प्रकाशित झालेल्या एका अग्रलेखाचं प्रकरण 2000 साली उकरुन काढण्यात आलं. तेव्हा बाळासाहेबांचं वय 70 वर्षांचं होतं. मात्र तेव्हा बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना केला. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. मात्र हा सर्व राजकारणाचा भाग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. संबंधित बातम्या :