Eknath Shinde Balasahebanchi ShivSena Mashal : आज उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून (Election Commission ) 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगानं चिन्ह जारी केल्यानंतर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावासह मशाल चिन्ह देण्यात आलंय.'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाकडून चिन्ह मिळाल्यानंतर लगेच नवा लोगो जारी करण्यात आला आहे.
धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं गेल्यानंतर आता 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाची नवी निशाणी मशाल असणार आहे. ही मशाल आता अशा प्रकारची असणार आहे. आगामी अंधेरी पोट निवडणुकीत आणि चिन्हाबाबत पुढील निर्णय येईस्तोवर आता याच मशालीचा डंका वाजणार आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्य
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.
शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.