नालासोपारा (ठाणे) : आमच्यावर बेछूट आरोप करण्यापेक्षा एकदा समोरासमोर या, माझी तयारी आहे, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. तसचे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
“मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच होणार, हे माहित असतानाच गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही? मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या मनात होते, मग तुम्ही मोदीसारखे रेडिओवर का नाही बोलत?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच, “मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. 15 लाख रुपये बँकेत जमा होणार, अच्छे दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी.”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“प्रकल्प सगळ्यांना हवेत. मात्र जर प्रकल्पामुळे आमच्या माय-भगिनींची चूल विझणार असेल तर मी ती विझू देणार नाही. सगळ्यांना मी सांगतोय, सगळ्यांनी एकत्र या.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रकल्पांबाबत आपली भूमिका मांडली.
“यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाहीत. उत्तर प्रदेशमधून माणसे आणतात. एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता. मात्र निष्ठेचा पराभव तुमचे भाडोत्री माणसे करु शकत नाहीत.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेवर टीका केली.
योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अखिलेश यादव परवा म्हणाले, जो मुख्यमंत्री भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही ते लोकांना काय मदत करणार? आज ते पलीकडे आलेत, त्यांच्या राज्यात मुलांना ऑक्सिजन मिळत नाही ते इथे आलेत.”
एकदा समोरासमोर या, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2018 11:17 PM (IST)
“मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. 15 लाख रुपये बँकेत जमा होणार, अच्छे दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी.”
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -