विरार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विरारमध्ये आले. 'सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय' असं म्हणत आदित्यनाथ यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर निशाणा साधला.


'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचा जुना आणि जवळचा संबंध आहे. भगवान राम यांना देवत्व प्रदान करणारी भूमी पंचवटी महाराष्ट्रात आहे आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा उत्तर प्रदेशच्या काशीतून पुरोहित गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला वेगळं करणारे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात मात्र कृती अफझल खानासारखी करतात', असं म्हणत योगींनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

'आज जर सगळ्यात जास्त कोणाला दुःख होत असेल, तर ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. बाळासाहेबांनी कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, तर कायम समोरुन लढा दिला. पण आज शिवसेनेची स्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही.
स्वतःच्याच भूमिकेची शिवसेनेने कुत्सित चेष्टा केली आहे', असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

'चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांना तोडून त्यांना जबरदस्ती उमेदवारी देण्याची आवश्यकता नव्हती. हा भाजपचा अंतर्गत विषय होता, आम्ही वनगा कुटुंबीयांचा योग्य सन्मान राखला असता' असंही आदित्यनाथ म्हणाले.

विपरित परिस्थितीत सरकार कसं चालवावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली.