मुंबई : रत्नागिरीतल्या वादग्रस्त नाणार प्रकल्पाला भाजपनं हिरवा कंदील दिल्यानं शिवसेना आणि भाजपत आरोप-प्रत्यारोपांचे नवे अंक सुरु झाले आहेत. कणाहीन मुख्यमंत्री आपल्या शब्दापासून मागे फिरले आहेत. मात्र कोणत्याही स्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं आहे.


रत्नागिरीतल्या नाणार ग्रीन रिफायनरीमुळे आजूबाजूच्या परिसरातील वनसंपदा धोक्यात येईल असा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा कडाकडून विरोध आहे. त्यातच शिवसेनेनं मैदानात उतरत राजकारणात उडी घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली कोकणचे वैभव मारु नका. तिथला आंबा, बांबूची वने नष्ट होतील. निसर्ग मारुन कोकणची राखरांगोळी करु नका,  हे मुद्दे मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत आले होते आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्यही केले होते. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीस ठणकावून सांगायला हवे होते की, 'माझ्या जनतेवर अन्याय होत असताना मी गप्प बसणार नाही.' अर्थात मुख्यमंत्री 'फितूर' झाले असले तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही.’