मुंबई : 2016 च्या अखेरीस नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणार, याबाबतची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात का केली नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. गेल्या वर्षीची आश्वासनं अद्याप अपूर्णच असल्याचं सांगत 'अर्थसंकल्पाला अर्थच काय?' अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
'नोटाबंदीमुळे सरकारकडे प्राप्तिकराच्या स्वरुपात मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात असले, तरी बडे कर्जबुडवे राहिले बाजूलाच आणि सर्वसामान्यांच्या खिशाला हात घातला गेला' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नोटाबंदी करणार हे गेल्या अर्थसंकल्पात का जाहीर केलं नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीमुळे जनतेला सोसावी लागलेली झळ केव्हाच भरुन निघणार नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
गेल्या वर्षीची आश्वासने अद्याप अपूर्ण असताना या अर्थसंकल्पाला अर्थच काय? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला. जनतेला दिलेली आश्वासने पूर्णच होत नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय? असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.