तौसीफच्या लग्नात देशभरातील चेन स्नेचर्स आणि चोरट्यांची गर्दी होती. त्यामुळे तौसिफला तात्काळ अटक करणं पोलिसांना शक्य झालं नाही. मात्र, त्यावेळी पोलिसांनी वाट पाहणं पसंत केलं. दरम्यान, कुणाला संशय येऊ नये यासाठी पोलीस चक्क लग्नाच्या वरातीत नाचलेही. त्यानंतर वऱ्हाडी परतल्यानंतर संधी मिळताच पोलिसांनी तौसीफच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली.
कल्याण पोलिसांना रविवारी एका लग्नाचे आमंत्रण मिळाले होते. लग्न कल्याणनजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीत होते. या लग्नात देशभरातून अनेक चोरटे आणि अट्टल चेन स्नॅचर्स हजेरी लावणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांचे पथकानं लग्नात हजेरी लावली. लग्न फारच थाटामाटात करण्यात आले होते.
लग्न सोहळा कधी संपणार याकडे पोलीस डोळे लावून बसले होते. अखेर रात्री उशीरा लग्नाचा कार्यक्रम उरकला आणि वऱ्हाडी निघून गेल्यानंतर पोलिसांनी तौसीफला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी आंबिवलीसह आसपासच्या परिसरातही सापळा रचला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तौसिफला अटक करत खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.