मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर आले. निमित्त होतं मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार वितरण सोहळ्याचं. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'हाऊज् द जोश' असं विचारताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाहत 'हाय सर!' असं उत्तर दिलं.


उद्धव ठाकरे यांना राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 'पॉवर आयकॉन' पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'आज राजकारणावर बोलायचं नाही. सोबत आले तर, नाही तर घेतलं शिंगावर, हा आपला खाक्या आहेच. आता ज्यांना युतीवर बोलायचं त्यांना बोलू द्या, मैदानात उतरल्यावर बघून घेऊ' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी युती अभेद्य असल्याचे संकेत दिले. आपल्याला मुख्यमंत्र्यांना 'हाऊज् द जोश' असं विचारायचं असल्याचं म्हणताच फडणवीसांनीही उत्स्फूर्तपणे 'हाय सर' असं उत्तर दिलं. विकी कौशलच्या 'उरी' चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.

'आम्ही राजकारणी घराघरात मतं मागायला जातो, मात्र आपण घराघरात जाता, ती घरं जिवंत करायला, त्यांचं घरपण टिकवायला' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव केला. आप्पासाहेबांच्या हस्ते उद्धव ठाकरेंना सन्मानित करण्यात आलं.

VIDEO | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण | एबीपी माझा





'आजच्या कार्यक्रमाला दहशतवादी हल्ल्याची झालर आहे. सगळे वाट पाहत आहेत, पाकिस्तानचं कंबरडं कधी आणि कसं मोडणार? सगळे एकवटलो तर सहज शक्य आहे. पाकड्यांच्या पेकाटात अशी लाथ मारली पाहिजे, की त्यांची उठून उभे राहण्याची हिंमत होणार नाहीत' अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

वर्तमानपत्र चालवणं म्हणजे नुसता धंदा नाही, हे मला माहित आहे. एक विचार घेऊन चालावं लागतं. समाजाला मार्गदर्शन करावं लागतं.
हा पुरस्कार शिवसैनिकांच्या वतीने स्वीकारत आहे. ते माझ्यासोबत उभे राहिले नाही, तर पॉवर आयकॉन काही नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हा सन्मान शिवसेना कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण केला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र जन्मभूमी, विकी कौशलची मराठीतून भाषणाला सुरुवात, पुलवामा हल्ला वैयक्तिक हानी

त्याशिवाय अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक रोहित शेट्टी या बॉलिवूडमधील कलाकारांनाही गौरवण्यात आलं. रितेश देशमुखला महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांना 'रंगभूमीवर सम्राट' म्हणून गौरवण्यात आलं, तर आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमासाठी अभिनेता सुबोध भावेचा सन्मान करण्यात आला.

क्रिकेटपटू स्मृती मानधना, अभिनेत्री गौरी इंगवले, अभिनेत्री कल्याणी मुळे, रंगभूषाकार विक्रम गायकवाड, चेतना सिन्हा, उद्योजक विशाल अग्रवाल यासारख्या अनेक हिऱ्यांनाही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आलं.