मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. भाजपला काय टीका करायची ती करु द्या, आपण आपलं काम घेऊन लोकांपुढे जाऊ, असं कार्यकर्त्यांना सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही आमची मुंबई घडवल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, मात्र ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का असा प्रश्न पडतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही, आता अच्छे दिनबद्दल कोणी का बोलत नाही, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.
जसं लाल किल्ल्यावर भाषण केल्यावर पंतप्रधान होत नाही, तसं स्वतःला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही, स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडव होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, उद्धव यांची दुर्योधनाशी तर भाजपची पांडवांशी अप्रत्यक्ष तुलना केली होती. हा प्रकार बघून कोकणातला दशावतार सुरु असावं असं वाटतं असल्याचं उद्धव म्हणाले.
भाजपला वाटतं केंद्रात सरकार आलं म्हणून ते राम मंदिर बांधतील. त्यावेळी हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा घणाघातही उद्धव यांनी केला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि त्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत, असं सांगताना आपण मुंबई-ठाणेकरांना दिलेलं वचन पाळणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
काँग्रेसला मोठा धक्का, आंबेरकर शिवसेनेत
निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. देवेंद्र आंबेरकर कामत गटाचे समर्थक मानले जातात. निरुपम विरुद्ध कामत गटाच्या वादाचा परिणाम म्हणून काँग्रेसमधल्या बंडखोरीला सुरुवात झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आंबेरकरांच्या हाती शिवबंधन बांधलं गेलं आहे.
भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री
युतीत सडलो म्हणणारे 25 वर्ष आमच्या पाठिंब्याने महापौरपदी बसले. मात्र 25 वर्षात मुंबईला बकाल केलं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका करत, चेकमेट करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेने युती तोडल्यानंतर, तुम्ही काय उत्तर देणार असं मला लोक विचारत होते. मात्र आम्ही जुगलबंदी किंवा मनोरंजन करणारे लोकं नाही, आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे लोक आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली.