मुंबई : आमचं हिंदुत्त्व तुमच्यासारखं थोतांड नाही. गाईला जपायचं अन् ताईला फोडायचं, असं म्हणत दसरा मेळाव्यातील भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली. नोटाबंदी, जीएसटी, काश्मीर प्रश्न, बुलेट ट्रेन, हिंदुत्त्व इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला केला.
मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील कालच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली आणि भाजपला धारेवर धरलं.
नोटबंदीचा निर्णय घेऊन देशाचं नुकसान करणारे देशद्रोही नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर पाकिस्तानप्रमाणे 40 ते 45 रुपयांत पेट्रोल विकलं तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी मारला.
“आम्हाला शेंडी, जानव्याचं हिंदुत्त्व मान्य नाही. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्त्व मान्य नाही. आमचं हिंदुत्त्व देशाशी निगडीत आहे.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला हिंदुत्त्वाची व्याख्या स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन रेल्वेमंत्र्यांवर निशाणा
“रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला.
बुलेट ट्रेनला विरोध
“कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळतं म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध केला.
गाईला जपायचं अन् ताईला झोडायचं, हे कसलं हिंदुत्त्व? : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2017 09:20 PM (IST)
मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील कालच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली आणि भाजपला धारेवर धरलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -