मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत प्रतिक्रिया देताना खासदार छत्रपती उदयनराजे म्हणाले की, आधी राजेशाही होती. परंतु आता राजेशाही जाऊन देशात लोकशाही आली आहे. लोकशाहीत आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. आपल्या मतांवर आमदार, खासदार निवडून येत असतात. त्यामुळे अशा नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला आणि बोलायला हवं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल तर तत्काळ त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्याठिकाणी उदयनराजे असतील तरी कारवाई ही व्हायलाच हवी. कायद्यासमोर सर्वजण समान असतात.


आज छत्रपती उदयनराजे भोसले मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंच्या भेटीचं कारण उदयनराजे यांना विचारलं असता. भेटी बाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, "आमच्या घरात लवकरच एक लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास 1 तास राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. भविष्यात देशाची वाटचाल कशी असावी, देशाच्या प्रगतीत आवश्यक बाबी कोणत्या असाव्यात याबाबत चर्चा झाली. पक्षीय लेव्हलची आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या पत्रिका देण्याच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी मी घेत आहे."


दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणार आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, "नुकतीच माझी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी देखील चर्चा झाली. मराठा आरक्षण प्रश्नी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये अशी विनंती मी त्यांना केली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मी स्वतः, तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आणि समितीतील सदस्य देखील उपस्थित असतील. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सरकार कोणती रणनीती अवलंबणार आहेत याबाबत चर्चा होणार आहे. मराठा समाजाची मागणी रास्त आहे. इतर समाजाला ज्या पद्दतीने आरक्षण मिळालं त्याच पद्यतीने मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी माझी इच्छा आहे."

दरम्यान संजय राठोड प्रकरणावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, "भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात."