मुंबईत 2 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या, मृतदेह गोणपाटात आढळला
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2017 08:17 AM (IST)
मुंबई : मुंबईत मालाडमध्ये दोन वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा बेपत्ता झाल्याच्या दहा तासांनंतर एका गोणपाटात त्याचा मृतदेह आढळला. सोमवारी दुपारी विवान कांदू हा दोन वर्षांचा चिमुकला घरासमोर खेळत असताना गायब झाला. सगळीकडे शोध घेतल्यानंतरही तो कुठेच न सापडल्याने अखेर कांदू कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. दहा तासांच्या शोधाशोधीनंतर विवानचा मृतदेह घराजवळ एका गोणपाटात सापडला. विवानच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा आहेत, मात्र त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला नसल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितलं आहे. विवान मालाडमध्ये त्याचे आई-वडील संदीप आणि सोनी कांदू तसंच मोठ्या भावासोबत राहत होता. संदीप यांचं दुकान असून, विवानचे काका-काकी जवळच एका चाळीत राहतात. विवानचा मृतदेह याच चाळीजवळ आढळला होता. प्रॉपर्टीच्या वादातून त्याचा बळी घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलाच्या काकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत. या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.