मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या यात्रा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवस्वराज्य यात्रेची आखणी केली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेद्वारे महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या खासादर डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे या यात्रेचे नेतृत्त्व देऊन युवा मतदारांमध्ये पोहचण्याचा राष्ट्रवादीचा एक प्रयत्न आहे.


शिवस्वराज्य यात्रेबाबत पक्षात गटबाजीचे राजकारण दिसून येत आहे. या यात्रेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या तरी अनेक नेत्यांना या यात्रेची माहिती नव्हती. अधिकृत घोषणेआधी यात्रेबाबत प्रसार माध्यमांनी बातमी छापल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी चर्चा झाली.

दुसरीकडे या यात्रेपासून पुरोगामी विचारांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांना दूर ठेवण्यात आले आहे. जनसंघर्ष यात्रेत आयोजनात आघाडीवर असणारे जितेंद्र आव्हाड शिवस्वराज्य यात्रेत मात्र दिसले नाहीत. आव्हाडांची पुरोगामी विचारांचे समर्थक अशी प्रतिमा पाहता या यात्रेपासून त्यांना दूर ठेवण्यात आले आहे की काय अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे.

शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आली. त्यावेळी केवळ डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. इतर नेत्यांनी केवळ सभेला हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीमधील पुरामुळे भाषण करुन लगेच निघाले. तर या यात्रेचा चेहरा असलेले दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी दांडी मारली.

आज यात्रेत भाषण करताना अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या 370 कलम हटवण्याचा निर्णयाचे समर्थन केले. अजित पवार यांनी विरोधाला विरोध करायचा नाही, पण याबाबतीत राजकारण नको, असे आपल्या भाषणात म्हंटलं. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयाविरोधात बोलतात तर अजित पवार निर्णयाचे स्वागत करतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन मुख्य नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसला.

एकूणच राष्ट्रवादी पक्षाला गळती लागली असताना अजून कोणते नेते भाजपमध्ये जाणार ही चर्चा पक्षात सुरु आहे. अशातच शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेतून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि युवा मतदारांपर्यंत पोहचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. या यात्रेने राष्ट्रवादीला फायदा होतो का? हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.

व्हिडीओ पाहा