वसई : वसईत खदाणीच्या पाण्यात  बुडालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. शाळेला दांडी मारुन इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या या मुली काल (12 फेब्रुवारी) आपल्या दोन मित्रांसोबत वसई पूर्व राजीवली परिसरातील खदाणीत फिरायला आल्या होत्या. मात्र सकाळी बाराच्या सुमारास खदाणीच्या पाण्यात त्या दोघीही बुडाल्या.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांची शोधमोहीम अद्यापही सुरु आहे. मुंबईतील या दोन मुली शाळा बुडवून आपल्या दोन मित्रांसोबत वसईतील खदाणीत फिरण्यासाठी गेल्या होत्या. हे चौघेही वांद्र्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बुडालेल्या दोन मुली सातवीत शिकणाऱ्या आहेत. तर त्यांच्यासोबत असणारे दोन्ही मुलं नववीत शिकत आहेत.

हे चौघे काल दुपारी बाराच्या सुमारास खदाणीत पोहोचले होते. ही खदाण 25 ते 30 फूट खोल आहे. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुली बुडाल्या. वसईचे वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान कालपासून मुलींचा शोध घेत आहेत. परंतु अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.

मुली पोहोण्यासाठी पाण्यात उतरल्या असा दावा काहींनी केला आहे. तर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या, असं काहींचं म्हणणं आहे. मुलींना वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र त्यांना त्या सापडल्या नाहीत.

इथे कपडे धुवणाऱ्या काही महिलांनी चौघांना खदाणीत न जाण्याचा सल्ला दिला दिला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत चौघेही पाण्यात उतरले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.