मुंबई : हक्काचं दालन मिळत नसल्याने मंत्र्यांनी थेट मंत्रालयातील दालनात घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभागाच्या दालनाचा अवैधरित्या ताबा घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप दालनाचं वाटप न झाल्याने राज्यमंत्र्यांनी घुसखोरी केली आहे.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या कृतीमुळे सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. राज्यमंत्र्यांनी दालन ताब्यात घेतल्यामुळे उपसचिवांवर सचिवांच्या दालनात बसण्याची वेळ आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचं दालन मंत्रालयातील सातव्या मजल्यावर आहे.
विधानभवनात मिळालेले तात्पुरते दालन अधिवेशनामुळे रिकामं करण्याची नोटीस मिळाली होती. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य खातं असल्याने लोकांना भेटण्यास व्यत्यय येत होता. त्यामुळे मंत्रालयातील सातव्या मजल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या दालनाचा ताबा घेतला, अशी कबुली राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोण आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर?
राजेंद्र पाटील यड्रावकर हे कोल्हापुरातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल 90 हजार 38 मतं मिळवून, शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा 27 हजार 824 मतांनी पराभव केला. निकालानंतर यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 14 जानेवारी 2020 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. विधानभवनातील दुसरा मजल्यावरील दालन क्र. 214 ब हे त्यांचं कार्यालय आहे.