कल्याण रेल्वे स्थानकाच्या फळात क्रमांक सातवर रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास एक इसम आपल्या दोन मुलींना घेऊन आला. कसारा दिशेच्या एका पोलखाली त्याने मुलींना बसवलं. काही वेळाने मुली झोपी गेल्या, आणि हीच संधी साधत या निर्दयी बापाने तिथून पलायन केलं.
रात्री दीडच्या सुमारास रेल्वे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन चिमुकल्या मुली फलाटावर झोपल्या असल्याचं निदर्शनास आलं. त्यांच्या आजूबाजूला कुणीही आढळून न आल्यानं अखेर या दोन मुलींना पोलिसांनी रेल्वे पोलीस ठाण्यात आणलं. मात्र अवघ्या दोन आणि तीन वर्षांच्या या मुलींना आपलं नावही सांगता येत नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी फलाटावरचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता त्यात एक इसम या मुलींना सोडून जात असल्याचं पोलिसांना आढळलं.
या इसमाचा फोटो बघून मुलींनी पप्पा म्हटल्यानं हा निर्दयी इसमच या मुलींचा बाप असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सध्या या दोन्ही मुलींची रवानगी एका संस्थेच्या आश्रमात करण्यात आली असून त्यांच्या निर्दयी बापाचा शोध सुरू असल्याची माहिती कल्याण जीआरपी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी दिली आहे.