5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची धडक, एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2018 08:48 AM (IST)
या अपघातात 10 गाड्यांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला.
रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला. बोरघाटात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 गाड्यांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. 5 कार , 4 ट्रक आणि एका टेम्पोची एकमेकांना धडक झाली. तर दुसऱ्या अपघातात एकूण 8 गाड्या धडकल्या. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात हे अपघात झाले. खोपोलीनजीक ट्रकची कंटेनर ट्रेलरला धडक झाली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्या अपघातात चार गाड्यांची एकमेकांना धडक बसली. त्यानंतर दोन कार आणि दोन ट्रकची धडक झाली. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा विचित्र अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात कशामुळे झाला, अपघाताला कोण कारणीभूत होतं? कोणाची चूक होती, हे आता पोलिसांच्या चौकशीनंतर कळू शकेल. मात्र असा विचित्र अपघात होऊन तब्बल दहा गाड्या एकमेकांना धडकल्याने सर्वत्र चर्चेचा विषय सुरु आहे. एक्स्प्रेस वेवर सर्वच वाहनांचा वेग सुसाट असतो. त्यामुळे ऐनवेळी वेगावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं. जर गाड्या रांगेत असल्या आणि पुढच्या गाडीचा अपघात झाला, तर मागची वाहनंही येऊन धडकतात, हे अनेकवेळा घडलेलं आहे. तसंच काहीसं आज झालं असावं, असा अंदाज आहे.