मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली आहे. यात मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी नागरिक जखमी देखील झाले आहेत. विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यासमोर देखील अशाचप्रकारे एक झाड कोसळलं. दैव बलवत्तर होतं म्हणून एक महिला थोडक्यात बचावली. ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीसीटीव्ही फूटेजनुसार, विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोरुन सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूचं भलं मोठं झाड कोसळलं. यावेळी या झाडाखालून काही पादचारी जाताना दिसत आहेत. यात एक महिला अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती. परंतु मोठा आवाज झाल्याने ती धावत मागे गेल्याने तिचे प्राण वाचले आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत महिला थोडक्यात बचावली.
दरम्यान हे झाड कोसळून पोलिसांच्या गाडीसह आजूबाजूचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
वरळीत झाड अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू
मुंबईतील आणखी एका घटनेत झाड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. वरळी परिसरातील जोरदार पावसामुळ झाड कोसळलं. यामध्ये रोहणी खरात या 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिणी यांना दोन लहान मुलं आहेत. त्या छोटामोठा व्यवसाय करुन पोट भरत होत्या.
तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत काल (17 मे) दिवसभरात 620 झाडे उन्मळून पडली. यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान झालं. तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.