नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामाची झलक आज नवी मुंबईकरांना पहायला मिळाली. शहरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज तुकाराम मुंढेंनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम सुरु केला.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाअंतर्गत सकाळी 6 वाजता सीबीडी खाडीजवळ आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत मुंढेंनी दोन महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. यावेळी नागरिकांनी उद्यानांच्या अवस्थेपासून, अनधिकृत कामांविषयीच्या आपल्या तक्रारी आयुक्तांसमोर मांडल्या.   आपल्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वेळा पालिकेत चकरा मारण्याचा वाईट अनुभव लोकांना आहे. मात्र आता प्रत्यक्षात आयुक्तच आपल्या दारी येत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण होतं.   दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानतंर आपल्या धडाकेबाज कामाला सुरुवातही तुकाराम मुंढे यांनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन करत, अनेकांचा एक दिवसाचा पगार कापला, तर दोघांचे पगारच रोखले.