डोंबिवली : केमिकल स्फोटाने हादरलेल्या डोंबिवलीकरांना आता चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. कारण स्फोटानंतर आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या नागरिकांची घरंच लुटायला चोरट्यांनी सुरुवात केली आहे.


 
डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 हून अधिक घरफोड्यांची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे स्फोटात घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणारे चोरटे पाहून असंवेदनशीलतेचं दर्शन घडत आहे.

 

 

प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमध्ये झाला नव्हता. अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं आहे. कंपनीत बॉयलरच नसल्याची कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. या स्फोटातील मृतांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे.

 

 

या स्फोटातील मृतांमध्ये कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांची दोन मुलं आणि सुनेचा समावेश आहे. स्फोटात सुमित वाकटकर, नंदन वाकटकर आणि सुमितची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात कंपनीचे मालक विश्वास वाकटकर हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

 

 

स्फोटाची खरी तीव्रता

 

 

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची तीव्रता किती भीषण होती, हे आज सकाळी खऱ्याअर्थानं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे सुमारे 10 फूट खोल आणि किमान 40 फूट रुंद खड्डा पडला आहे.

 

 

काल दुपारपासून सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये ढिगारा हटवण्यात आला. आणि त्यानंतर स्फोटाचं रौद्र रुप समोर आलं आहे. इतकंच नाही तर ब्रोमेस कंपनीला खेटून उभ्या असलेल्या इमारतींचीही काय अवस्था झाली आहे. हेही आता समोर आलं आहे.

 

 

भीषण स्फोट सीसीटीव्हीत कैद

 

 

ज्या स्फोटानं काल संपूर्ण डोंबिवली हादरली, त्या स्फोटाची भीषणता परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केली. ते सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं.

 

 

डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की फक्त आवाजानंच आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज होताच लोक घराबाहेर पडण्यासाठी कशी धावपळ करतायत, याची दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

 

 

प्रोबेस कंपनीपासून साधारण किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानातली ही दृश्य आहेत. बऱ्याच ठिकाणी काचाच नाही तर काही दुकानांचं अक्षरशः सिलिंग देखील कोसळलं आहे.

 

 

भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली

 

 

डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला.

 

 

स्फोट इतका भीषण होता की ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या.

 

 

प्रोबसेच्या शेजारीही केमिकल कंपन्या असल्याने आग पसरत गेली. त्यामुळे लागलीच हा परिसर रिकामा करण्यात आला. तसंच इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला.

 

 

या स्फोटानं प्रोबेस एन्टरप्रायजेसची 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉयलरमधल्या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.

 

 

स्फोटातल्या जखमींवर डोंबिवलीतल्या विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

 


संबंधित बातम्या


EXCLUSIVE : असा घडला स्फोट! डोंबिवली स्फोटाचं सीसीटीव्ही फूटेज


केमिकल कंपन्या डोंबिवलीतून हटवणार?


डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट, चौघांचा मृत्यू


PHOTO: डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, धूर आणि काचांचा खच