मुंबई: शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर आता तृप्ती देसाई यांनी मुंबईच्या हजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी लढा सुरु केला आहे.
यासंदर्भात 'हाजी अली सबके लिए' फोरमची स्थापना करण्यात आली आहे. हजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी ट्रस्टींसोबत चर्चा केली जाणार आहे. जर महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश मिळाला नाही तर 28 एप्रिल रोजी 'हाजी अली सबके लिए' फोरम धरणं आंदोलन करणार आहे.
मुंबईतील काही सेक्युलर संस्था आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन या फोरमची स्थापना केली आहे.
या फोरमच्या माध्यमातून स्त्रियांना सर्व धार्मिक स्थळांवर पुरूषांप्रमाणेच समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, "हिंदुत्ववाद्यांचा आरोप होता की आम्ही विशिष्ट धर्माला विरोध करत आहोत. मात्र तसे नसून आम्ही संविधानातील अधिकारांसाठी संघर्ष करतोय. आतापर्यंत भूमाता ब्रिगेड आंदोलन करत होती. आता आमच्यासोबत या सर्व संघटना आहेत याचा आनंद आहे. सर्व जाती धर्मांच्या महिलांना त्यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार. आम्ही परंपरेच्या विरोधात नाही चुकीच्या परंपरेविरोधात लढतोय. हायकोर्टातही भूमाता ब्रिगेडकडून हाजी अली बाबतचा निर्णय घेण्यासाठी निवेदन केलं जाईल".
तृप्ती देसाईंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
हाजी अली दर्गाहमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी 'हाजी अली सबके लिए' फोरमची स्थापना
- 28 एप्रिलला हाजी अली दर्गाहच्या बाहेर 'हाजी अली सबके लिए' फोरमचे धरणे आंदोलन
- आंदोलनाच्या आधी हाजी अली दर्गाहच्या ट्रस्टींसोबत चर्चा करण्याचीही हाजी अली सबके लिए फोरमची तयारी
- त्र्यंबकेश्वरला महिलांना पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या अमानुष मारहाणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार.
- आज पत्रकार परिषद नसती तर त्र्यंबकेश्वरला तात्काळ रवाना झाली असती
- त्र्यंबकेश्वरच्या विशवस्त पदी एक महिला न्यायाधीश आहेत. या पदावर बसून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करत आहेत. मग त्यांना न्यायाधीश पदावर का बसू द्यायचं हा जाब मी त्र्यंबकेश्वरला जाऊन मी विचारणार आहे.
जावेद आनंद, मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रसी:
- मुंबईतील काही सेक्युलर संस्था आणि काही नागरिकांनी एक बैठक घेऊन या फोरमची स्थापना केली आहे.
- या फोरमच्या माध्यमातून स्त्रियांना सर्व धार्मिक स्थळांवर पुरूषांप्रमाणेच समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार
- शनि शिंगणापूर येथील शनि चौथऱ्यावर तसेच महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये पुरूषांप्रमाणेच महिलांनाही प्रवेश मिळावा या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयांचे फोरमकडून स्वागत
- केरळमधील शबरीमला मंदीरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सुप्रिम कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा. फोरम या निर्णयाची आतूरतेने वाट पाहात आहे.
- हाजी अली दर्गाहमध्ये 2011 पर्यंत महिलांना प्रवेश होता. 2011 नंतर महिलांना प्रवेश नाकारण्यात आला.
- हाजी अली दर्गाहमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा अशी फोरमची मागणी
- माहिमच्या मगदूम शाह बाबा दर्गाहमध्ये महिलांना प्रवेश दिला जातो, मग हाजी अली दर्गाहमध्ये प्रवेश का नाकारला जातोय?
- मगदूम शाह बाबा दर्गाह आणि हाजी अली दर्गाहवरील काही ट्रस्टी एकच आहेत. मग तेच लोक दोन्हीकडे वेगवेगळा न्याय का देत आहेत?