मुंबई : मुंबईत धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणं जीवावर बेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दादर स्टेशनवर धावती लोकल पकडताना रुळांवर पडून 25 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांआधी सुदर्शन चौधरीवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


मूळचा नागपूरचा असलेला सुदर्शन चौधरी मुंबईत मालाडमध्ये वास्तव्यास होता. मित्रांसोबत रविवारी पहाटे ट्रेकिंगला जाण्याचा प्लान त्याने आखला होता. मात्र सुदर्शन ट्रेकिंगला आला नाही आणि घरीही परतला नाही, म्हणून मित्रांनी त्याच्या फोनवर संपर्क साधला, तेव्हा त्याचा मोबाईल दादर रेल्वे पोलिसांकडे असल्याची माहिती मिळाली.

सुदर्शनच्या मित्रांनी दादर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं असता हा प्रकार समोर आला. दादर स्टेशनला फलाट क्रमांक 1 वर धावती लोकल पकडताना तोल गेल्यामुळे सुदर्शनचा अपघात झाला होता.



सुदर्शन आई-वडिलांना एकुलता एक होता. विशेष म्हणजे, त्याचं लग्न अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. त्याच्या अकाली निधनामुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धावती लोकल पकडणं जीवघेणं असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत.