नवी मुंबई : खासगी वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरवाढीविरोधात खासगी वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. आज (सोमवारी) नवी मुंबईतील तळोजा येथे या संपाला हिंसक वळण लागले.
संपात सहभागी न झालेल्या वाहनांची तोडफोड करत आंदोलकांनी 12 वाहनांचे नुकसान केले आहे. आंदोलकांनी औद्योगिक वसाहतीमधील ट्रक, ट्रेलर यांसारख्या वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. आज पहाटे 3 वाजता ही तोडफोड करण्यात आली.
तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 जणांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.
या वाहतूक संपात खासगी ट्रक मालक-चालक, बस चालक-मालक, टेम्पो आणि कॅबनेही सहभाग नोंदवलाय.
वाहतूक संपाचा परिणाम
संपाच्या चौथ्या दिवशी कोणताही परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. सकाळपासून भाजीपाल्याच्या 550 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झाली आहे. दरम्यान आज एकादशी असल्याने मालाला मागणीही कमी आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.