मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सायन येथील उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम 20 एप्रिलपासून हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी सुमारे दोन महिने उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दररोज हजारो वाहनं या उड्डाणपुलावरुन ये-जा करत असतात, त्यामुळे सायन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.


आयआयटी मुंबईमार्फत सायन येथील उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या. बेअरिंग बदलण्याचे काम होईपर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना सांगण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री सायन उड्डाणपुलाच्या कठड्याच्या बाहेरील भागातून प्लास्टरचा काही भाग खाली पडला होता. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मुख्य उड्डाणपुलाचा कोणताही भाग खराब झालेला नाही, असे रस्ते विकास महामंडळाने नमूद केले आहे.

व्हिडीओ पाहा



उड्डाणपुलाला एकूण 170 बेअरिंग
उड्डाणपुलाला एकूण 170 बेअरिंग असून दोन महिन्यांच्या कालावधीत ते पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत. 20 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असून हे काम संपेपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील, असेही रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.