मुंबई : मुख्य स्टेशन वर सुरू असणाऱ्या कोरोनाची चाचणी टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी एक नवी शक्कल लढवली आहे. रेल्वेची साखळी खेचून गाडी स्टेशन आधीच थांबवण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांत साखळी खेचण्याच्या 63 घटना घडलेल्या आहेत.


दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान इथून मेल-एक्स्प्रेसने मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी टाळण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. ज्या स्थानकात करोना चाचणी होते आहे, ते स्थानक येण्याआधीच उतरण्यासाठी एक्स्प्रेस गाड्यांमधील आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबविली जात आहे.


गेल्या दहा-बारा दिवसांत साखळी खेचून गाडी थांबवण्याचे प्रकार वाढले असून अशा 63 घटना उघडकीस आल्या आहेत. चार राज्यांतून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना चाचणीचा अहवाल बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 96 तास आधी कोरोना चाचणी किंवा राज्यातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर प्रवाशांची तपासणी हा नियम आहे. रेल्वे आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी केली जाते. हे काम त्या त्या महापालिकांकडून सुरू आहे.


कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास प्रवाशाची कोरोना केंद्रात रवानगी करण्यात येते. मात्र ही चाचणी टाळण्यासाठी काही प्रवासी मेल-एक्स्प्रेस गाड्या संबंधित चाचणी केंद्र असलेल्या थांब्यावर न उतरता आधीच गाडी थांबवून उतरत आहेत. यासाठी गाड्यांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी खेचली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक 36 घटना पश्चिम रेल्वेवरील आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे .