कल्याण : बदलापूरच्या चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकरची अखेर 30 तासांनी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पनवेलच्या निसर्गमित्र ट्रेकर्स ग्रुपने या अडकलेल्या ट्रेकरला आज दुपारी सुखरूप खाली आणलं आहे.


उदय रेड्डी असं या अडकलेल्या ट्रेकरचं नाव आहे. मूळचा सिल्व्हासाचा असलेला उदय काल सकाळी बदलापूरच्या चिंचवली गावातून चंदेरी किल्ल्यावर ट्रेकला जायला निघाला. मात्र पुढे गेल्यावर रस्ता चुकल्यानं तो चंदेरी ऐवजी म्हैसमाळच्या सुळक्यावर चढला आणि अडकून बसला.


सभोवतालचं जंगल, दूरदूरपर्यंत माणसांचा पत्ता नाही अशा परिस्थितीत उदड फसला होता. मात्र सुदैवाने त्याच्या मोबाईलला रेंज आली. उदयने वेळ न दवडता आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या गिर्यारोहक मित्रांना फोन केला. त्यानंतर मित्रांनी ट्रेकर्स आणि पोलिसांना संपर्क साधत मदतीची याचना केली.


पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच चंदेरी गडाच्या पनवेलकडच्या बाजूने पनवेलचे निसर्गमित्र ट्रेकर्स त्याच्या मदतीला आले. मात्र ज्या ठिकाणी हा पर्यटक अडकला होता, तिथे पोहोचणं प्रोफेशनल ट्रेकर्सनाही अवघड बनलं होतं. त्यात रात्रीचा अंधार आणि विषारी सापांचा वावर यामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं.


सरतेशेवटी आज सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा एकदा सुळक्यावर चढाई सुरू करून ट्रेकर्स साडेदहा वाजता उदयपर्यंत पोहोचले आणि त्याला सुखरूप खाली उतरवलं.


आपण केवळ दैव बलवत्तर म्हणूनच परत आल्याची प्रतिक्रिया उदय रेड्डीने दिली.


चंदेरी किंवा कुठल्याही नवीन किल्ल्यावर, डोंगरावर ट्रेकिंगसाठी जाताना आधी स्थानिक परिसराची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. मात्र स्थानिकांचा सल्ला न ऐकता जाणं अनेकदा अशाप्रकारे आपल्याला अडचणीत आणू शकतं. त्यामुळेच गेल्या चार ते पाच महिन्यात अनेक पर्यटक चंदेरी किल्ल्यावर भरकटले आहेत. खुद्द चंदेरीच्या पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.