मुंबई: नोटाबदलीप्रकरणी बँकांचे अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर आता रेल्वे अधिकाऱ्यांचा नंबर लागला आहे. मुंबईतील सीएसटी, ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांतील आरक्षित तिकीट खिडक्यांवर बेकायदेशीररित्या दोन हजार आणि चलनातील १०० रुपयांच्या नोटा बदलून दिल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर झाला आहे. याप्रकरणी मध्य रेल्वेचे सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक के एल भोयर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ८.२२ लाख रुपये बदलून दिल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे. याशिवाय इतर ठिकाणी अशा प्रकारे जुन्या नोटा बदलून नव्या नोटा दिल्या का याचा तपासही सीबीआयकडून केला जात आहे.