नागपूर : गेल्या काही दिवसात बलात्काराची व्याख्या बदलली आहे, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बलात्कारांच्या घटनांमध्ये घट झाल्याचं स्पष्ट केलं.
गुन्ह्यांमध्ये घट
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गंभीर गुन्ह्यांमध्ये 4.92 टक्के म्हणजेच 10,595 ने घट झाली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं. मात्र गुन्हेसिद्धतेचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे 100 पैकी 56 गुन्हेगारांना शिक्षा होते, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महिला अत्याचारात 103 ने घट झाली आहे. अर्थात हे पाठ थोपटवून घेण्यासारखं नसलं तरीही यापूर्वी जे गुन्हे दाबले जात होते, ते महिला अत्याचाराची व्याख्या व्यापक झाल्यानंतर पीडितांकडून नोंदवले जात आहेत, असा दावा त्यांनी केला. तसंच 97 टक्के बलात्काराचे गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महिला अत्याचाराचे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी 27 विशेष न्यायालयं आणि 22 जलदगती न्यायालयं राज्यात कार्यरत आहेत, तर बहुतांश प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल झाल्याचंही त्यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं.
डिजिटायझेशन वाढल्यामुळे डिजिटल गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब सुरु करण्यात आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सरकारी नोकर आणि पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदे
सरकारी नोकर आणि पोलिसांवरील वाढलेल्या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी कायदे आणखी कडक करणार असल्याची माहिती दिली. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यासाठी शिक्षा 2 वर्षांवरुन 5 वर्षांवर करण्यात आली आहे, तसंच हा गुन्हा अदखलपात्र असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
नागपूरबद्दल मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
नागपूर शहराची हद्द वाढवण्यात आली, त्यामुळे नागपूरची लोकसंख्या 5 लाखांनी वाढली. असं असलं तरीही गुन्ह्यामध्ये वाढ झाली नाही, उलट गुन्हे मोठ्या प्रमाणावर घटले आहेत. नागपूरबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांना माझा सलाम आहे. शहरात जादा पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी आम्ही विरोधीपक्षात असताना करत होतो. आम्ही सत्ते आल्यावर 5 नवीन पोलीस स्टेशन सुरु केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
नागपूरला विरोधी पक्षनेते बदनाम करत आहेत. नागपूरमध्ये मोठे बदल होत आहेत, मेट्रो प्रकल्पासह नवीन रस्तेही तयार होत आहेत. शहराचं चांगलं विरोधकांना बघवत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचं कौतुक
देशात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र पोलिसांचं मी कौतुक करतो, महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान योजनेअंतर्गत 10 हजार मुलांना घरी पाठवलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं. तसंच 143 कैदी पॅरोलवर परत आल्याची माहिती विरोधीपक्षानं चुकीची दिली आहे. ही आकडेवारी 1978 पासूनची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही सर्व पोलीस स्टेशन जोडली आहेत, आता फक्त फिंगर प्रिंट्सबाबतचा डेटा गोळा करत आहोत. यामुळे गुन्हेगाराने जरी खोटं नाव आणि माहिती दिली तरी ती लगेच समजेल आणि आरोपीला ओळखता येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.