मुंबई : मुंबईतील वाहन प्रवेश 1 ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील.
मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे. एमएमआर भागातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी 2002 ते 2027 या 25 वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्ये रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता 40 रुपये होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक पास आता 1400 रुपयांवरुन 1500 रुपये होणार आहे.
टोल आकारणी कशी असणार?
छोटी वाहनं - आधी 35 रुपये, आता 40 रुपये (5 रुपयांची वाढ)
मध्यम अवजड वाहनं - आधी 55 रुपये, आता 65 रुपये (10 रुपयांची वाढ)
ट्रक-बसेस - आधी 105 रुपये, आता 130 रुपये (25 रुपयांची वाढ)
अवजड वाहनं - आधी 135, आता 160 रुपये (25 रुपयांची वाढ)
हलक्या वाहनांचा मासिक पास - आधी 1400 रुपये, आता 1500 रुपये (100 रुपयांची वाढ)