मुंबई : सरकारच्या आदेशानंतरही वाशी टोल नाक्यावर टोलवसुली सुरुच आहे. राज्य सरकारने 11 तारखेपर्यंत टोलवसुली थांबवण्याच्या निर्णयाला वाशी टोलनाक्यावर हरताळ फासण्यात आल्याचं चित्र आहे.


राज्यातल्या सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुली 11 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेक नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस, मुंबईतील एन्ट्री पॉईंट्स, वांद्रे-वरळी सी लिंक अशा सर्वच टोलनाक्यांवर टोल आकारण्यात येणार नाही.

राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या सर्व टोलनाक्यांवर 11 तारखेपर्यंत टोलवसुली बंद राहणार आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 11 नोव्हेंबरपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही ही घोषणा केली.