Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 7 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान 'न्याय संकल्प' पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे.


हे दिग्गज नेते राहणार उपस्थित


दरम्यान, राहुल गांधींच्या आजच्या सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.


मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान राहुल गांधींची पदयात्रा होणार


दरम्यान, आजच्या सभेपूर्वी राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ही पदयात्रा असणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत.


सोनिया गांधी राहणार उपस्थित


दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर इंडिया आघाडीकडून (India Alliance) जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निमित्त सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एनडीएला हरवण्यासाठी इंडिया आघाडी जोमाने तयारी करत आहे.


महत्वाच्या बातम्या:


राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शिवतीर्थावर होणार समारोप; शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित