मुंबई: अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. संकेतस्थळावर डेटा अपलोड झाला नसल्यामुळे अकरावी प्रवेशाची पहिली यादी अजूनही जाहीर झालेली नाही. पहिली यादी जाहीर व्हायला रात्रीचे ११ ते १२ वाजू शकतात, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. दरम्यान लाखो विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष या यादीकडे लागून राहिलं आहे.


सोमवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण कंपनीने दुपारपासून काम सुरु केले तरी वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यंदा जास्त गुण मिळल्याने पहिल्या यादीचा कट ऑफ किती असणार याकडे सर्वंचे लक्ष लागून आहे. पण अजूनही यादीच जाहीर न झाल्याने आता विद्यर्थी पालक तणावाखाली आहेत. आणि पुन्हा एकदा शिक्षण विभागची ऑनलाईन प्रक्रिया फसल्याचे समोर आले आहे

मुंबईच्या कॉलेजात कट ऑफसाठी 4 ते 7 गुणांचा फरक दिसून येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये 95 ते 100 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यानं या यादीत 4 ते 8 गुणांची वाढ असेल. त्यामुळे भरमसाठ गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजसाठी कसरत करावी लागणार आहे.

दुसरीकडे आयसीएसई आणि सीबीएसईचा निकालही चांगला लागल्यानं त्याचा फटकाही राज्यातल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे पहिल्या लिस्टमधल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा की दुसऱ्या लिस्टची वाट पाहावी या संभ्रमात विद्यार्थी दिसून येत आहेत.