मुंबई : मुंबई शहरासह उपनगरं आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधून मुंबईत नोकरीसाठी लाखो लोक दररोज येत आहेत. सध्या कोरोनामुळे लोकल सेवा बंद असल्यामुळे या नागरिकांचा वेळ प्रवासात अधिक जात आहे. त्यातून त्यांचे हालही मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रवाशांसाठी मुबलक बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्ट प्रशासनानं एसटी महामंडळाकडे 1000 एसटी बसची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने बेस्ट प्रशासनाकडे 1000 बसेस पैकी तीनशे एसटी बसेस दिल्या आहेत. या बसेस मुंबईत दाखल झाल्या असून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळालेला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या देश अनलॉकच्या दिशेने जात असून महाराष्ट्रासह मुंबईतील प्रशासकीय कार्यालये आणि खासगी कार्यालये हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मुंबई शहरामध्ये कामासाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे अधिकारी, कर्मचारी मुंबई बाहेरील उपनगर आणि मुंबई शेजारीच असणार्या जिल्ह्यांमधून दररोज मुंबईत कामासाठी येत असतात. सध्या लोकल बंद असल्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दररोजच्या प्रवासात येण्या-जाण्यासाठी सहा ते सात तास जात असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच बेस्टच्या बसेस या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कमी पडत असल्याने राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासनाच्या वतीने एसटी महामंडळाकडे या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी 1000 बसेसची मागणी केली होती.
एसटी महामंडळाने सध्या 1000 बसेस पैकी 300 बसेस पहिल्या टप्प्यात मुंबईकरांच्या प्रवासासाठी दिलेल्या आहेत. या एसटी बसेस मुंबई शहर व उपनगरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बेस्ट बसेसचे थांबे आहेत. त्या ठिकाणाहून प्रवाशांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी सेवा देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत.
प्रवास मार्ग
1) विरार नालासोपारा ते मुंबई
2) अंबरनाथ, कल्याण - डोंबिवली ते मुंबई
3) खोपोली, पनवेल ते मुंबई
या प्रमुख मार्गासह मुंबई शहर आणि उपनगरातील हजारो थांब्यांवर या एसटी बसेस थांबून प्रवाशांची ने-आण करणार आहेत.
कोरोनाच्या काळात सुरुवातीला एसटी बसेस देखील बंद होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली. सध्या राज्यातील इतर ठिकाणी जरी वाहतूक कमी असली तरी त्याच्या तुलनेत मुंबई उपनगर आणि शेजारीच असणार्या जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांना दररोज ने-आण करण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या बसेस कमी पडत असून प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी महामंडळाने बेस्टच्या मदतीला 1000 एसटी बसेस देण्याचे मान्य केले आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरणार असून पहिल्या टप्प्यात 300 दुसऱ्या टप्प्यात 200 आणि तिसर्या टप्प्यात गरजेनुसार उर्वरित बस मुंबईच्या रस्त्यांवर धावण्याचं नियोजन करण्यात आलेला आहे. प्रवास आणि मार्ग याचं नियोजन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलं असून एसटी महामंडळ आपल्या बसेस आणि कर्मचारी या सेवेसाठी पूर्वत आहे. यातून एसटी महामंडळाला देखील उत्पन्न मिळणार असून लॉकडाऊनमुळे महामंडळाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी असे नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत, असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.