Tirupati Balaji Temple : प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी संस्थानाकडून नवी मुंबईतील उलवे येथे भव्य असे बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) उभारण्यात येणार आहे. 10 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या (21 ऑगस्ट) होणार होता. यासाठी मंडप उभारुन जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. मात्र सीआरझेड भागात सिडकोने भूखंड दिल्यानं केंद्रीय हरित लवादाने याची चौकशी लावल्याने हा भूमिपूजन सोहळा रद्द झाला असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा उद्या पार पडणार होता.
सिडकोने 10 एकराची जागा बालाजी मंदिरासाठी दिली असली तरी ही सिआरझेड एक मध्ये मोडत आहे. खाडी किनारी मॅंग्रोजला लागून हा भूखंड असल्यानं इथे बांधकाम करण्यास परवानगी नसल्याचे सांगत पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. याबाबत नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे लेखी तक्रार केली होती. केंद्रीय पर्यावरण विभागाने आलेल्या तक्रारी दखल घेत चौकशी करण्याचे आदेश एमसीझेडएमए विभागाला दिले आहेत. सीआरझेडमध्ये येणाऱ्या भूखंडाची केंद्रीय पर्यावरण विभागाने चौकशी लावल्याने उद्या होणारा भूमिपूजन सोहळा राज्य सरकारने रद्द केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं सिडकोने चुकीच्या ठिकाणी भूखंड दिल्यानेच भूमिपूजन सोहळा रद्द करण्याची नामुष्की तिरुपती बालाजी मंदिर संस्थानावर आली असल्याचे समोर येत आहे.
सिडको 10 एकरची जागा बालाजी मंदिरासाठी दिली होती. पण यावर आमचा यावर आक्षेप आहे. कारण हे क्षेत्र सिआरझेडचे आहे. अशा जागेवर बांधकाम करता येत नसल्याची माहिती नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली आहे. मंदिर असो, मस्जिद असो किंवा इमारती असो अशी बांधकाम या जागेत होत नसल्याची माहिती बी. एन. कुमार यांनी दिली. ही जागा मोकळी ठेवायला पाहिजे, कारण किनारपट्टीचे रक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पर्यावरणाचे रक्षण करायला पाहिजे असे सांगतिले आहे. मुख्यमंत्रीसुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाबाबत बोलतात मग ही जागा मंदिरासाठी कशी देता येईल असेही बी. एन. कुमार म्हणाले. मंदिराला आमचा विरोध नाही. लोकांना पुकरायला धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिर हवे आहे. पण दुसऱ्या ठिकाणी सरकारनं जागा द्यावी असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
शिर्डी साई संस्थान, तिरुपती बालाजी देवस्थानसह देशभरातील सहा हजार अशासकीय संस्थांचं विदेशी चलन खातं गोठवलं