चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी गावात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत वाघ अंदाजे 3 वर्षांचा आहे. शेताच्या कुंपणात सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहरली गेटजवळ भामडेळी हे गाव आहे. मृत वाघ हा तारा वाघिणीचा बछडा असल्याची माहिती रेडीओ कॉलरने मिळाली.

गावातील ऋषी नन्नावरे आणि अभिमन्यू चहांदे यांच्या शेताच्या धुऱ्यावर हा वाघ तारांमध्ये अडकल्याचं निदर्शनास आलं. मात्र अंधार अधिक झाल्याने वाघाला बाहेर काढण्यासाठी पहाट उजाडावी लागली. सकाळी ताडोबा प्रशासन, वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाघाला तारांपासून वेगळे केले. तसेच वन्यजीव चिकित्सकांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.

वन्यजीवांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तारांच्या कुंपणात अवैधपणे सोडलेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्याने हा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेताच्या कुंपणात सोडली जाणारी वीज वाघांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान वनविभागाने या संबंधित शेतमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वनविभागाद्वारे संपूर्ण ताडोबाच्या सभोवताल असलेल्या शेतशिवारांना 'सौर ऊर्जा कुंपण'  योजना निश्चित केली जाणार होती. ही योजना तातडीने लागू करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.