मुंबई : मुंबईत लोकल चालवणाऱ्या मोटरमनला प्रश्न विचारुन त्रास देत त्यांचे व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने तीन तरुणांना अटक केली आहे.


लोकल चलावणाऱ्या मोटरमनला नाहक प्रश्न विचारुन आरोपी त्यांना त्रास द्यायचे आणि या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे. गेल्या वर्षी अनेक मोटरमननी याबाबत तक्रार दिल्यानंतर तिघांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आलं.

सोशल मीडियावर सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण काही ना काही करत असतात. त्यात यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन पैसे मिळवण्याचं फॅड सुरु झालं आहे. हीच आवड विक्रोळीतील तिघा तरुणांना महागात पडली आहे.

केवळ थट्टा म्हणून मोटरमन आणि सामान्य नागरिक यांच्यासोबत हे तरुण प्रँक करायचे. ते मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन यूट्यूबवर अपलोड करायचे. एक-दोन व्हिडिओजना चांगले व्ह्यूज मिळाल्यानंतर त्यांनी सपाटाच लावला. मुख्य म्हणजे ज्या मोटरमनच्या हातात हजारो मुंबईकरांचा जीव असतो, त्यांच्यासोबत हे प्रँक केले आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले.

याबाबत पाच मोटरमननी गेल्या वर्षी तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास आरपीएफ करत होती. अखेर सायबर सेलची मदत घेऊन विक्रोळी भागातून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर रेल्वे अॅक्टची विविध कलमं लावण्यात आली आहेत. असे प्रँक करुन लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात न आणण्याचं आवाहन आरपीएफद्वारे करण्यात आले आहे.