मुंबई : मुंबईत सध्या साथीच्या, संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत आहे. गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे या आजारांचं प्रमाण आणखी वाढू शकतं. मुंबईत लेप्टोने महिनाभरात 3 बळी घेतले आहेत. तर स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2019 च्या साथ आणि संसर्गजन्य आजारांची आकडेवारी मुंबई महापालिकेने जारी केली आहे.

या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2018 च्या तुलनेत ऑगस्ट 2019 मध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, हेपेटायटिस या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र लेप्टोच्या बळींची संख्या सारखीच आहे. के पश्चिम वॉर्डमधील (अंधेरी) 58 वर्षीय पुरुष आणि 29 वर्षीय तरुणीचा तर पी दक्षिण वॉर्डमधील (गोरेगांव) 41 वर्षीय व्यक्तीचा लेप्टोने बळी घेतला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र यंदा स्वाईन फ्लूचे तब्बल 36 रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा बळी गेला आहे. के पश्चिम (अंधेरी) 64 वर्षीय पुरुषाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. लेप्टो आणि स्वाईन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आवाहन करण्यात आलं आहे.

काय काळजी घ्याल

पाण्यातून गेला असाल आणि त्यानंतर तुम्हाला ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. अति ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा. स्वत:च औषधोपचार करु नका. कचऱ्याच्या ठिकाणी उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा आवर असतो, त्यांच्यामुळेच लेप्टोची लागण होते, त्यामुळे आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, असा सल्ला महापालिकेनं नागरिकांना दिली आहे.

आजार        ऑगस्ट  2018        ऑगस्ट 2019

                   रुग्ण         मृत्यू        रुग्ण        मृत्यू

लेप्टो              46            3           45           3

स्वाईन फ्लू       0             0          36            1

डेंग्यू              153           3         134           0

मलेरिया          853           1         767           0

गॅस्ट्रो             645           0         623           0

हेपेटायटिस       135           0         147          0