नवी मुंबई : हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
आज (22 डिसेंबर) मध्यरात्री पासून 25 तारखेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या 3 दिवसांत सीएसटी ते नेरुळ मार्गापर्यंत रेल्वे सुरू असणार आहे. मात्र नेरुळ ते पनवेल रेल्वे सेवा पूर्णपणे 3 दिवस बंद असणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेने आपल्या 30 अतिरिक्त बस या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नेरुळ ते बेलापूर, खारघर आणि पनवेल दरम्यान धावणार आहेत.
दरम्यान, बेलापूरच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बेलापूरच्या पुढील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेरुळ ते पनवेल ट्रेन पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.