Mumbai Crime News: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस (Mumbai Andheri Police) ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली अक्सा मस्जिद परिसरात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक (Mumbai ATS) आणि डी एन नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही बांगलादेशी नागरिक भारतात अवैध मार्गाने घुसून मागील सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होते.
डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली परिसरात तीन बांगलादेशी नागरिक अवैधपणे मागील सहा महिन्यापासून वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्यांकडून डी एन नगर पोलीस ठाण्याला मिळाली होती. यानंतर मिळालेल्या माहितीची खात्री जमा करून डी एन नगर पोलीस ठाणे आणि दहशतवादी पथकाने या बांगलादेशींना पकडण्यासाठी पथक तयार केले. डी एन नगर पोलीस आणि दहशतवादी पथकाची टीम या बांगलादेशींना ताब्यात घेण्यासाठी खबऱ्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली असता घर बंद असल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.
खबऱ्यामार्फत मिळाली माहिती, मुंबई पोलिसांची धडक कारवाई
मात्र एक नोव्हेंबर या दिवशी तिघेही बांगलादेशी नागरिक अक्सा मस्जिद जवळील सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ येणार असल्याचे पक्की खबर मिळाली. यानंतर पंच आणि कारवाईसाठी नेमलेली टीम अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली भगत वायरलेस रोड जवळील सार्वजनिक सुलभ शौचालय जवळ पोहोचून तीनही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्या बंद घराची झाडाझडती करून तपासणी केली. मात्र हे तीनही आरोपी पोट भरण्यासाठी मुंबईत मागील सहा महिन्यापूर्वी दलालाच्या मदतीने कोलकत्ता आणि आगरताळा मार्गे जिथे संरक्षक कुंपण नाही अशा जंगली भागातून भारतात घुसले असल्याचे तीनही बांगलादेशी नागरिकांनी कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले मोहम्मद जाफर बदल आलम शेख, 44 वर्ष, रेहान मोहम्मद नबी शेख, 23 वर्ष आणि मोहम्मद सोयल साबुद्दीन खान, 30 वर्ष हे तीनही आरोपी डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे. हे तिघेही बांगलादेश मधील नवखाली कबीरहाट भागात राहणारे आहेत.
ही बातमी देखील वाचा