भिवंडी : भिवंडी शहरात अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या चुलत भावावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अजमेर येथून मुख्य आरोपीसह अटक केली आहे .
शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत नौशाद मुख्तार सिद्धीकी वय 38 ,रा.नागाव याच्या चुलत बहिणीसोबत त्याच्या बहिणीचा नवरा अशफाक सिद्धीकीचे अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यास नौशाद सिद्धीकी हा विरोध करत होता. त्या सोबतच आपल्या पत्नीचे सोन्याचे दागिने स्वतः कडे ठेवल्याचा राग मनात धरून अशफाक सिद्धीकी व त्याचे साथीदार अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान या तिघांनी नौशाद सिद्धीकी याच्या घराबाहेर येऊन त्या सोबत हुज्जत घातली. यावेळी नौशाद वर अशफाक याने आपल्याकडील पिस्तुलाने एक राऊंड गोळी झाडून पसार झाले. या हल्ल्यात नौशाद थोडक्यात बचावले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी शीतल राऊत यांनी ठिकठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केली. मुख्य आरोपी अशफाक सिद्दीकी यास अजमेर राजस्थान येथील हॉटेल मधून ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहिती वरून भिवंडी शहरातून दोन साथीदार अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल जप्त करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.