ठाणे : सुप्रसिद्ध हिरानंदानी बिल्डर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तीन जणांना ताब्यात घेतलंय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक आणि सध्या भाजपमध्ये असलेले सुधीर बर्गे यांचाही समावेश आहे.


सुधीर बर्गे यांच्यासोबतच माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी, आरिफ इराकी यांनाही अटक करण्यात आली आहे. माहिती अधिकार आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून या तीन जणांकडून खंडणी उकळली जात होती, अशी माहिती आहे.

आरटीआय कार्यकर्त्यांचं खंडणी उकळणारं रॅकेट ठाणे आणि मुंबईत कार्यरत असल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या तीन जणांचं नाव समोर आलं.

2007 साली ठाण्याच्या लोकमान्य नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बर्गे निवडून आले होते. तर मागील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.