मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली होती. धमकीचा मेल आल्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे असं अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदेचं वय 45-50 च्या दरम्यान आहे.
त्यांनी आपल्या मुलाचे पुण्यातील वानवडी येथील हाचिंग्स शाळेने एका वर्षाचे नुकसान केले म्हणून तीन वर्षांपूर्वी उपोषण केले होते. याशिवाय शिक्षण विभागाकडे याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही लक्ष न दिल्याने शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात धमकी वजा इशारा ईमेल पाठविला होता. याबाबत मुंबई मंत्रालयातून माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आता त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे.