मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान लावण्यात आलेली इलेक्शन ड्युटी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना महागात पडली आहे. बायोमेट्रिक पद्धतीच्या गोंधळामुळे हजारो कर्मचाऱ्यांना वेतन कपातीला सामोरं जावं लागलं आहे.


मुंबई महापालिकेच्या एक लाख कर्मचाऱ्यांपैकी 70 हजार कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पद्धतीतील गोंधळामुळे वेतन कपातीला सामोरं जावं लागलं आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या हातात तर शून्य पगाराची पावती पडल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

यामध्ये निवडणूक कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नैमित्तिक रजा, आठवडा सुट्टी याचे अपडेट होणं गरजेचे असतानाही त्याऐवजी कामावर न आल्याचा शेरा पडल्यानं मोठ्या प्रमाणात वेतन कपात झाली आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रजा अपडेट करायच्या की मानव संसाधन विभागानं हे काम करायचे, या वादात हा गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. 12 मेपर्यंत जर कपात झालेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा म्युन्सिपल मजदूर युनियने दिला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.