मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील सरकार आभासी आहे. देशातील संपूर्ण जनतेला केवळ आभास दाखवून त्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.
राज्यातील भाजपा सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर करेल, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं. भ्रष्टाचारी मंत्री, वाढती गुन्हेगारी, दुष्काळ यासह अनेक प्रश्नांवर उद्याच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रावादीने नेते अजित पवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील नागरिक सरकारवर नाराज आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात पाण्याचा तुटवडा आहे. सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत, पण कामं प्रत्यक्षात दिसत नाहीत. गल्ली ते दिल्ली युतीचं सरकार आहे. हे सरकार इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेत आहेत, त्यांच्याकडे माणसे नाहीत का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
या सरकारवर पूर्वी ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना या सरकारने मंत्री केले. मात्र या सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात उत्तरे द्यावी लागतील. केवळ सहा मंत्र्यांना काढून चालणार नाही. फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहे. या साऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही अजित पवारांनी केली.