नालासोपाऱ्यातील एका इमारतीत दोन चोरांनी तीन वेळा चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाती कंडोम, साबण अशा वस्तू आणि आठ हजार रुपयांची रोकड लागली. रेल्वे स्टेशनजवळील पार्श्वनाथ इमारतीत ही घटना घडली आहे. चोरांचे हे अयशस्वी प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
सुरुवातीला या चोरांनी तळमजल्यावरील एका मेडिकल स्टोअरचं शटर तोडून त्यात घुसखोरी केली. तिथे त्यांच्या हाती केवळ 5 हजार रुपयेच लागले. त्यामुळे त्यांनी कंडोमची पाकिटं, कॉम्प्युटरचा सीपीयू आणि मोबाईल फोनवर डल्ला मारला. चोरीला गेलेल्या सीपीयूमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या प्रयत्नात निराशा आल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या मेडिकल स्टोअरकडे वळवला. तिथेही फक्त त्यांना 3 हजार रुपये आणि पतंजलीचं तूप, चॉकलेट आणि साबणावरच समाधान मानावं लागले.
तिसरी चोरी करण्यासाठी दोघे चोरटे एका कोचिंग सेंटरमध्ये घुसले. तिथेही त्यांना केवळ एक स्वस्तातला मोबाईलच सापडला. सीसीटीव्हीमध्ये जरी दोनच चोर दिसत असले, तरी आणखी काही चोर सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.