मुंबई : सरकारकडून कांदाप्रश्नी (Onion) तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याचं यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटलं आहे. दरम्यान  राज्यात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटलाय. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावा अशी मागणी सध्या कांदा व्यापाऱ्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेत. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर कांदा उत्पादक शेतकरी, कांदा व्यापारी, बाजार समितीचे सदस्य यांची बैठक पार पडली. 


या बैठकीमध्ये केंद्रीय सचिव उपस्थित नसल्यामुळे तोडगा काढता आला नसल्याचं यावेळी अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. तर 29 सप्टेंबरला पुढची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट 5 टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट 50 टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी. अशा मागण्या सध्या कांदा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. 


बैठकीमध्ये काय घडलं? 


सह्याद्री अतिगृहावर पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. परंतु तरीही कांदाप्रश्नी कोणताही तोडगा या बैठकीमध्ये निघाला नाही. तर पुन्हा 29 सप्टेंबर रोजी या मुद्द्यावर पुन्हा बैठक पार पडणार आहे. ही बैठक दिल्लीत पार पडेल. तर या बैठकीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय.


दरम्यान या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा पणन खात्याकडून ठोस निर्णय घेतला जाईल असं देखील सांगण्यात आलय. तर   बाजार समितीच्या ज्या काही समस्या असतील त्या संर्दभात तीन दिवसांत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.  दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असं आश्वासन देखील दिल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलं. 


कांद्याच्या प्रश्नी शेतकरी देखील सध्या चिंतेत आहे. त्यामुळे या प्रश्नावर सरकारने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी जोर धरतेय. तर सरकार यावर कोणती ठोस पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Onion : कांदा प्रश्न पेटला! मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत आज बैठक; वाचा नेमकं कोण काय म्हणालं?