वसई : घरातल्या लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, असं वारंवार का सांगितलं जातं, याची प्रचिती वसईतल्या कोळी कुटुंबीयांना आली आहे. रात्री आई-वडील झोपलेले असताना अडीच वर्षाच्या मुलाने केलेल्या प्रतापाने संपूर्ण गावाची मात्र झोप उडाली.


नायगावच्या खोचीवड्यातला अडीच वर्षांचा नॅथलीन 13 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता झोपेतून एकटाच उठला. त्यानंतर त्याने बेडरुमची कडी काढली मग घराची कडी काढली. त्यानंतर त्याने गेटची कडी काढून तो घराबाहेर पडला. बरं रात्रीचा किर्रर्र अंधार... गल्लीत कुत्र्यांची भुंकाभुंक तरीही नॅथनील निवांत चालत राहिला.



सुमारे तासभर चालतचालत पठ्ठ्यानं दोन किलोमीटरचा पल्ला पार केला. इकडे आपल्या पोराच्या महापराक्रमाची कोणतीही कल्पना नसलेले पालक पहाटे 5 वाजता जागे झाले आणि त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.

कुशीत झोपलेलं पोर गेलं कुठे? अशी घालमेल सुरु झाली. आईनं हंबरडा फोडला. वडिलांची धावपळ उडाली. अख्खा गाव नॅथलीनला शोधू लागला.



कुठे शेजाऱ्यांकडे गेला आहे का? इथपासून कुणी अपहरण केलं आहे का? इथंपर्यंत डोक्यात प्रश्नांची जत्रा भरली. या सगळ्या गोंधळात 8 वाजले आणि व्हॉट्सॅपवर एक मेसेज आला आणि नॅथलीनच्या आई-बापांचा जीव भांड्यात पडला

नॅथलीन जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर निवांत फिरत होता तेव्हा दोन भल्या माणसांनी त्याला पोलीस ठाण्याला पोहोचवलं. याच नागरिकांच्या सर्तकतेमुळे नॅथलीन आणि त्याच्या पालकांची भेट होऊ शकली.